Satara Police : वेशभूषा करून डोंगरातून फिल्मी स्टाईलने आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सातारा | सातारा शहरातील एका व्यवसायिकास वडिलांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी 5 लाखांची खंडणी न दिल्याने धारधार हत्याराने वार करून या गुन्ह्यातील आरोपी पसार झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात त्याचा शोध घेतला जात असताना आरोपींना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून डोंगरातून फिल्मी स्टाईलने ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेशभूषा करत पळून जाताना आरोपींना पाठलाग करून पकडले. यामध्ये अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय- 28 वर्षे), ऋषिकेश उर्फ डोंगुल्या नाना कांबळे (वय- 23 वर्षे), सर्जेराव उर्फ छोट्या पांडूरंग कांबळे (वय- 20 वर्षे, सर्व रा. प्रतापसिंहनगर- सातारा) व विलास उर्फ यल्या शरणाप्पा कुरमणी (वय- 22 वर्षे, रा. वनवासवाडी- सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका व्यवसायिकास मोक्का केसमध्ये जेलमध्ये असलेला दत्ता जाधव (रा. प्रतापसिंहनगर- सातारा) याचा मुलगा लल्लन जाधव याने त्यास तुझ्यामुळे माझा बाप मोक्याचे केस मध्ये जेलमध्ये आहे. त्याला तू जबाबदार असून त्यास जेलमधून बाहेर काढण्यासाठी पाच लाख रूपयेची खंडणी मागितली. व सदरची रककम दिली नाही तर जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली होती. त्यानंतर रात्रीचे सुमारास लल्लन जाधव व त्याचे अन्य साथीदारांनी खंडणी न दिल्याने त्यास जीवे मारण्याचे हेतूने त्याचेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याचे खिशातील त्या व्यक्तिने पैसे जबरदस्तीने काढून घेवून ते पळून गेले होते.
डी. बी. पथकाने अशी केली फिल्मी स्टाईल कारवाई
सातारा शहर डी. बी. पथकाने संबंधित संशयितांचा शोध करित असताना सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जावून सदर संशयितांची माहिती कौशल्यपूर्वक प्राप्त केली. सदरचे संशयित हे जत तालुक्यातील एका डोंगर कपारीत आसरा घेवून राहत असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदरचे संशयित हे अत्यंत खूनशी व सराईत असल्याने त्यांना पकडणेकरिता दोन पथक तयार करण्यात आले. सदर पथकातील काही पोलीस स्टापने विशिष्ठ वेशभूषा करून आरोपीचा ठावठिकाण्याची माहिती घेतली. परंतू, सदर ठिकाणी जात असताना काळोख झालेला होता. सदरचे ठिकाण अत्यंत निर्जन असल्याने संशयितांना चाहूल लागण्याची दाट शक्यता वाटू लागल्याने सदर पथकाने डोंगर कपारीमध्ये ठिकठिकाणी रात्रीचे थांबून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवले. संशयित हे डोंगरकपारीतून बाहेर येत असल्याची हालचाल दिसून आल्याने पोलीस स्टापने त्यांना चारही बाजूने घेरले होते. त्यावेळी सदर संशयित हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस स्टापने त्याना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. सदरचे संशयितांना डी. बी. पथकाने अत्यंत चिकाटीने व कौशल्यपूर्वक माहिती काढून ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. श्रीनिवास देशमुख, सुजीत भोसले, पो.ना. राहुल घाडगे, अविनाश चव्हाण, विक्रम माने, पो. कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, विशाल धुमाळ यांनी सदरची कारवाई केली आहे.