साताऱ्याचा पुढचा खासदार? (भाग- 1): राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अन् भाजप नंबर 1
– विशाल वामनराव पाटील (लोकसभा)
लोकसभा निवडणूक अजून लांब असली तरी आता दिवाळीच्या फटाक्यांसोबत लोकसभेची तयारीला सुरूवात होणार आहे. सध्यातरी इच्छुकांकडून चाचपणी सुरू झाली असून सुप्त इच्छा अजूनही गुप्तच ठेवली जात आहे. कारण राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्याकडून कोणता आदेश येईल अन् इच्छेचा बिमोड होईल हे सांगता येवू शकत नाही. त्यामुळेच इच्छा असूनही तयारीला लागा, लागलो आहे असे सांगता येईना. सध्यस्थिती ज्यांचा सातारा लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला जावू शकतो, त्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतच दोन- दोन गट पडलेले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे दोन गट असल्याने उमेदवार एक कि दोन? शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास सांगितला आहे. त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना लोकसभा मतदार स्वतःकडे ठेवणार की भाजपाला सोडणार? सध्या बराच गोंधळांची परिस्थिती जर- तर ची परिस्थिती सर्वच पक्षात पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या अन् आज नंबर 1 वर भाजप परिस्थिती पहायला मिळत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघाचा सहभाग आहे. यामध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, जावली- सातारा, कोरेगाव, वाई- महाबळेश्वर- खंडाळा असे 8 तालुक्याचे 6 मतदार संघ आहेत. तर खटाव तालुक्यातील काही भाग कराड उत्तर मतदार संघात असतो. उर्वरित माण- खटाव व फलटण हा माढा लोकसभा मतदार संघात असतो. सातारा लोकसभा मतदार संघात निवडणुकीत सातारा व कराड असा विभागला जातो. तेव्हा आता या दोन्ही विभातून जादा मते मिळवणारा खासदार होतो, हे निश्चित असून नक्की कोण बाजी मारणार हे पक्ष चिन्हासोबत व्यक्ती महत्वाचा आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण मतदार संघातील लोकांच्या नाराजीचा फटका उमेदवाराला बसलेला पहायला मिळाला आहे.
सातारा जिल्हा 1999 पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राहिला आहे. आता या पक्षात दोन गट पडले आहेत. पूर्वीच्या शिवसेना- भाजप युतीत हा लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा राहिला तर काॅंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीचा मतदार संघ राहिला. परंतु, आगामी लोकसभेला अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी विभागली गेल्याने ताकद कमी झाली आहे. तर भाजपाला कधीच या मतदार संघात पूर्वी उमेदवार मिळाला नाही आणि हक्कही सांगता आला नाही. अशावेळी सध्याच्या घडीला फोडाफोडीच्या राजकारणामुळे सातारा जिल्ह्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष आहे, हे नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादीत फूट पडल्याने काॅंग्रेसलाही सातारा जिल्ह्यात चांगले दिवस असून लोकसभेला काॅंग्रेसच्या उमेदवाराचाही विचार होवू शकतो. परंतु, ही सध्याच्या परिस्थितीत भाजपचे आमदारांच्यात आणि पदाधिकारी हे पूर्वीचे राष्ट्रवादीचे आहेत, तेव्हा ऐनवेळी शरद पवार रणनिती आखू नये अन् दगा होवू नये.
सातारा जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील विधानसभा सध्यस्थिती ः-
सातारा- भाजप- आ. शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव- शिंदे गट (शिवसेना)- आ. महेश शिंदे, वाई- अजित पवार गट (राष्ट्रवादी)- आ. मकरंद पाटील, कराड उत्तर- शरद पवार गट (राष्ट्रवादी)- आ. बाळासाहेब पाटील, कराड दक्षिण- काॅंग्रेस- आ. पृथ्वीराज चव्हाण, पाटण- शिंदे गट (शिवसेना)- आ. शंभूराज देसाई. (पुढील भाग- 2 – चर्चेतील नावे)