काॅंग्रेसचे मिशन सातारा व माढा लोकसभा : आ. भाई जगताप घेणार 2 दिवस आढावा

सातारा | सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काॅंग्रेसचे आमदार आणि सातारा जिल्ह्याचे निरीक्षक भाई जगताप हे दोन दिवस जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येत आहेत. शुक्रवार दि. 11 रोजी कराड येथून दाैरा सुरू होणार तालुकानिहाय बैठकी होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे. या बैठकीमुळे काॅंग्रेस स्वबळाची चाचपणी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील सध्याची राजकीय स्थिती काय आहे. तसेच राज्यातील जनतेच्या मनात काय आहे. राजकीय वातावरणात झालेल्या राजकीय घडामोडीचा काय परिणाम झाला आहे, याची माहिती मिळण्याच्या सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सातारा लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप हे जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार व शनिवारी आ. भाई जगताप दाैऱ्यावर
शुक्रवारी (दि. 11) दुपारी दीड वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक होईल. त्यानंतर 3 वाजता पाटण आणि साडेचारला कराड उत्तर मतदारसंघाची बैठक होणार आहे. शनिवारी (दि. 12) सातारा काॅंग्रेस कमिटीत सकाळी 11 ला सातारा विधानसभा मतदारसंघ, दुपारी 12 ला कोरेगाव आणि एक वाजता वाई विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे.