Maratha Reservation : जरांगे- पाटलांचे रणशिंग योग्यच म्हणणाऱ्या राऊतांवर शंभूराज देसाईंचा पलटवार
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मुंबईत मराठा आरक्षणासाठी महामोर्चाची तयारी सुरू आहे. मराठा समाज आझाद मैदानावरून हल्लाबोल करणार आहे. सरकारपुढे कायदा आणि सुव्यवस्थेचे खूप मोठे आव्हान आहे. अशावेळी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी मनोज जरांगे- पाटील यांनी फुकलेलं रणशिंग योग्यच आहे, असे म्हटले होते. त्यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिप्रश्न करत पलटवार केला आहे. हायकोर्टात टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकू शकलं नाही, याचं उत्तर मंत्री देसाईंनी मागितलेलं आहे.
सातारा येथे मराठा आरक्षण, मनोज जरांगे- पाटील यांची भूमिका आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टात का टिकू शकलं नाही. तेव्हा कोणाचं सरकार होतं. या प्रश्नाचं पहिलं उत्तर विनायक राऊतांनी एका वाक्यात उत्तर द्याव, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे- पाटील यांनी 20 तारखेला मुंबईला जाण्याचा नारा दिलेला आहे, त्याबाबत मराठा आरक्षण उपसमितीची प्रदिर्घ बैठक झाली. मी स्वतः त्यांना बैठकीचं पत्र दिलं होत, मात्र जरांगे- पाटील बैठकीला आले नाहीत. तरीसुध्दा ते आॅनलाईन ज्वाईन झाले. बैठकीतील आमची भूमिका त्यांना पटलेली आहे. त्यांनी सगेसोयरे या प्रमाणे सगळ्यांना दाखले देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत सगेसोयरे यांचा संदर्भ- व्याख्या कशी करायची यांचा अभिप्राय आम्ही मागितलेला आहे. याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकार याबाबत नकारार्थी नाही. माझं वैयक्तिक मत असा आहे की 20 तारखेला मनोज जरांगे- पाटील यांना मुंबईला येण्याची गरज लागणार नाही. जरांगे पाटील यांना विनंती आहे. घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊन चालणार नाही. सध्या 85% हा विषय मार्गी लागलेला आहे. त्यामुळे सहकार्याची भूमिका त्यांनी घ्यावी, अशी विनंती मंत्री देसाई यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त श्रीराम वक्तव्याबाबत माझं वैयक्तिक मत
जितेंद्र आव्हाड हे विधानसभा सदस्य आहेत. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या खूप जवळ आहेत. अशा व्यक्तीने प्रभू श्रीरामाबद्दल मासांहर करायचं, अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे खूप चुकीचा आहे. ज्यांना आपण भक्तीभावाने पूजतो, त्यांना अभिषेक केल्यानंतर आपण ते पाणी सेवन करतो. अशा पुूजनीय देवदेवातांच्या बाबतीत वक्तव्य करणं खेदजनक असून अशा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी तो शब्दप्रयोग देखील केल नाही. केवळ मला याविषयी खेद वाटतोय, असं ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात याबाबत त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत आहेत. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणालेत.