पुणे- बेंगलोर महामार्गावर ‘पिवळं वादळं’ घोंगावलं : वाहतूक थांबली
धनगर आरक्षणाचा प्रारंभ खंडाळा तालुक्यातून

सातारा | पुणे- बेंगलोर महामार्गावर खंडाळा येथे धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभरातील समाज बांधवांनी आंदोलनाचा नारा दिला. या आंदोलनामुळे महामार्गावर जणू ‘पिवळं वादळ’ पसरलेलं पहायला मिळालं. धनगर समाजाच्या राज्यस्तरीय आंदोलनाची सुरूवात खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटातून करण्यात आली होती गेला. आता आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन न थांबविण्याचा निश्चय आरक्षण लढा समितीच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
आज खंबाटकी घाटातून धनगर आरक्षणाचा नारा घुमला. एक तासभर महामार्ग रोखल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. धनगर आरक्षण लढ्याची सुरुवात लढ्याचे जनक बी. के. कोकरे यांनी चौतीस वर्षापूर्वी खंबाटकी घाटात मशाल पेटवून केली होती. या घटनेचे औचित्य साधून धनगर समाज आरक्षण लढा समितीने आंदोलनाचा मार्ग निवडला. खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हे पिवळं वादळ महामार्गावर धडकलं. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी काही वर्षापूर्वी साखळी उपोषण केले होते. मात्र शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.
या आंदोलनासाठी तालुक्यासह राज्यातील इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील लोक जमले होते. यावेळी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर भाषणे आणि घोषणा देऊन लढा प्रोत्साहित केला. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस आणि आंदोलक युवक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.