आ. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले म्हणाले… दिरंगाईने कार्यक्रम होतोय दुर्दैवी

वैभव बोडके | सातारा प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सातारा शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे उद्घाटनानंतर उदयनराजेंच्या सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी (सविआ) टीकास्त्र सोडले. सातारकरांना पाणीपुरवठा करणारी योजना सत्तारूढ पदाधिकाऱ्यांच्या काळात नाही तर प्रशासकाच्या काळात पूर्ण झाली असून सगळे माजी अध्यक्ष , माजी नगरसेवक झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याचे सांगत छ. उदयनराजे भोसले यांना डिवचले.
अमृत 2.0 योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते कास धरण पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सत्तारूढ सातारा विकास आघाडीने ही योजना पूर्ण करण्यास दिरंगाई केली. आत्तापर्यंत हा निधी येऊन कासच पाणी सातारकरांच्या नळालाही आलं असत. मात्र, नियोजन नसल्यामुळे हा सर्व विलंब झाला आहे. शेवटी प्रशासकाच्या काळात हे काम पूर्णत्वास जात आहे. नगरपालिकेत निवडून दिलेल्या नगरसेवकांना हे काम करता आलं नाही. या ठिकाणी मी ऐकत होतो. माजी अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष असं सगळं ऐकत होतो. तेव्हा सगळे माजी झाल्यानंतर काम पूर्ण होतंय हे दुर्दैवी आहे.
सातारा पालिकेच्या 4.5 कोटी वीज बिलाची बचत होणार
कास योजनेच्या कामामुळे विलासपूर , शाहूनगर आणि संपूर्ण सातारा शहराला पाणी पुरवठा होणार आहे. सातारा नगरपालिकेचे 4.5 कोटीची विजेची बचत होणार आहे. ही याेजना 27 किलोमीटरची जलवाहिनी आहे. या योजनेमुळे दहा पटीने पाण्याचा साठा सध्या झालेला पाहायला मिळत आहे कुठल्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार आहे तसेच ही योजना पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अनेकांनी मदत केल्याचे छ. उदयनराजे भोसले म्हणाले.