वीज वितरणला दणका : कोरोनात शेतकऱ्याला अंदाजे दिलेले 75 हजारांचे बिल वाचले
कोल्हापूर | कोरोनाचे कारण सांगून कृषी पंपाचे मीटर रीडिंग न देताच दिलेले 57 हजार 955 युनिटचे 94 हजार 159 एवढे बिल रद्द करून ग्राहकास 11 हजार 591 युनिटचे 18 हजार 831 रुपये बिल नव्याने द्यावे, असा आदेश महावितरणच्याच ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे. त्यामुळे ग्राहकाचे बिलापोटी जाणारे तब्बल 75 हजार 328 रुपये वाचले आहेत. महावितरण ग्राहकांकडून कशा पद्धतीने बिल वसुली करते, यावरही या निमित्ताने प्रकाश पडला आहे.
सोळांकूर (ता. राधानगरी) येथील मिलिंद विनायक कुलकर्णी यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यांच्यावतीने ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते संजय हुक्केरी यांनी बाजू मांडली व महावितरणचा रीडिंग घेण्यातील खोटेपणा सिद्ध केला. मंचचे स्वतंत्र सदस्य श्रीकांत बावीसकर आणि सुधाकर जाधव यांनी 13 ऑक्टोबरला हा निकाल दिला. महावितरण कंपनीने 24 मार्च 2023 चा मीटर तपासणी अहवाल व 16 नोव्हेंबर 2022 चा स्थळ परीक्षण अहवाल सादर केला होता. महावितरण कंपनीनेच सादर केलेल्या तक्त्यावरून सप्टेंबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत सरासरी तिमाही वापर 295 युनिट्स तर डिसेंबर 2019 ते मार्च 2022 (30 महिने) सरासरी तिमाही वापर 5795 युनिट्स व जून 2022 ते जून 2023 या कालावधीतील सरासरी तिमाही वापर 845 युनिट्स आढळतो.
वरील सर्व प्रकार असताना तक्रार कालावधीत तिमाही वीज वापर 5795 युनिट्स का आहे, याचा खुलासा महावितरण करू शकले नाही. मीटर सुस्थितीत असतानाही ग्राहकाला अंदाजित बिले दिल्याचे निरीक्षण मंचाने नोंदवले व म्हणूनच 11 हजार 591 युनिट्सचे सुधारित देयक द्यावे. ग्राहकावर लादलेले जादा बिल महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे, असेही आदेशात म्हटले आहे.