साताऱ्यातील धक्कादायक प्रकार : चाऱ्याचे पैसे मागायला गेलेल्या महिलेला भरचौकात बेदम मारहाण अन् गावकरी पहात राहिले

सातारा | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात भररस्त्यात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पानवण येथे गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून भर चौकात चौघांनी महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील केल्याचे समजत आहे. याप्रकरणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
म्हसवड पोलिसांनी याप्रकरणी देवदास नरळे, पिंटू नरळे या दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपींनी महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचेही व्हायरल व्हिडीओमधून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार होत असताना गावकऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
दरम्यान, पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी देवदास महादेव तुपे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरदचा व्हिडिअो व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला असून यावेळी गावकरी केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याने संताप येणारा सर्व प्रकार दिसत आहे.