पुणे- बेंगलोर महामार्गावर केमिकल सांडल्याने एसटी, कार घसरली

सातारा | पुणे- बेंगलोर महामार्गावर भरतगाव (ता. सातारा) हद्दीत अज्ञात वाहनातील केमिकल सांडल्याने एसटीसह कार घसरून रस्त्याच्या कडेला वाहनांना धडकली. सुदैवाने वाहन चालकांनी वाहनांवर ताबा मिळवल्याने मोठ्या अपघाताची घटना टळली. मात्र, यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती. तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याच्या दिशेला निघालेल्या लेनवर अज्ञात वाहनातील केमिकल सांडले होते. त्यामुळे वाहने केमिकलवरून घसरत होती. यामध्ये एसटी बस व एक कार घसरल्याने रस्त्याच्या कडेला जावून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. काही वेळानंतर महामार्गावर अग्निशामक दलाच्या वाहनातून रस्त्यावर प्रेशरने पाणी मारून केमिकल धुण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
सकाळी कोल्हापूर लेन तर सायंकाळी पुणे लेनवर ट्रॅफिक
सकाळी शेद्रे येथे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेला निघालेल्या 4 गाड्यांचा विचित्र अपघात अपघात झाला होता. पहाटे झालेल्या या अपघातामध्ये चार जण जखमी झाले. या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे सकाळी कोल्हापूर लेनवर तर सायंकाळी पुणे लेनवर वाहतूकीचा खोळंबा झाला होता.