माण व खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात : आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
कराड | सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. या गावांमध्ये जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने या भागात तात्काळ चारा छावण्या सुरु करण्याबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मदत-पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पाऊस पडला असला तरी माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पुरेसा पाऊस न झाला नाही. या भागात दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. माण व खटाव तालुक्यातील दुष्काळजन्य गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये तात्काळ चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे, तसेच पशुधन वाचविण्यासाठी या दुष्काळग्रस्त भागात त्वरित चारा छावण्या सुरु करण्याकरिता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून चारा छावण्या सुरु करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे.सातारा
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
सातारा जिल्ह्यात दरवर्षी महाबळेश्वर, नवजा, कोयना, पाटण, जावली, वाई, सातारा व कराड तालुक्यात जोरदार पाऊस हजेरी लावत असतो. तसेच 15 आॅगस्ट पर्यंत कोयना धरण भरून पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. मात्र, चालूवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोयना धरण अद्याप भरलेलं नाही. तर दुसरीकडे खटाव- माण तालुक्यात दुष्काळच्या झळा सोसाव्या लागू लागल्या आहेत.