साताऱ्यात म्हाडाचा उपअभियंता लाच घेताना सापडला
सातारा :- नाहरकत दाखला देण्यासाठी लाच घेणारा म्हाडाचा उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार शेतकऱ्याला 7 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 4 हजारांची लाच घेताना सदरची कारवाई करण्यात आली आहे. मनोजकुमार दशरथ माने (म्हाडा वरिष्ठ लिपीक, उपअभियंता, उपविभाग सातारा) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार शेतकरी असून पत्नीच्या नावे सातारारोड (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील म्हाडा वसाहतीत असणारा जमीन प्लाॅट विकणेसाठी नाहरकत दाखला देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. लोकसेवक मनोज माने याने 22 जुलै रोजी तक्रारदाराकडे 7 हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती 4 हजार रूपये घेताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली.
पोलीस अधीक्षक पुणे शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चाैधरी, सातारा पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोहवा गणेश ताटे, पोना निलेश चव्हाण यांनी सापळा रचून कारवाई केली.