Accident : उंब्रजजवळ कार घुसली कंटेनरमध्ये, गाडीचा चक्काचूर

उंब्रज। पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटून कार कंटेनरच्या पाठीमागे घुसून अपघात झाल्याची घटना घडली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून उंब्रज गावच्या हद्दीतून वरदराज मंगल कार्यालयासमोरून जाणा-या कार क्रमांक (एमएच- 12- एस क्यू- 1431) वरील चालकाचा ताबा सुटून पुढे चाललेल्या कंटेनर मध्ये कार घुसली. यामध्ये कंटनेर पुढे जाताच कार महामार्गाच्या डिव्हायडरवर आदळून अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती उंब्रज पोलीसांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेवून वाहन चालविण्याची अपेक्षा नागरिकांच्यातून केली जात आहे. उंब्रज परिसरात अनेकदा भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.



