माजी पंचायत समिती सदस्यांच्या घरी चोरी : 10 तोळे सोने व रोख रक्कम लंपास

खटाव | खटाव पंचायत समितीच्या माजी सदस्या आशा संजय पानस्कर यांच्या सूर्याचीवाडी येथील घरातून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केली. या चोरीत 10 तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. चोरट्यांनी जवळपास साडेसहा लाखांची घरफोडी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, सूर्याचीवाडी येथे गावात ग्रामसभा असल्याने लोक त्याठिकाणी गेले होते. यादरम्यान आशाताई पानस्कर व त्यांचे पती संजय पानस्कर या घराला कुलूप लावून शेतात गेल्या होत्या. सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर घराचे कडीकोयंडा व कुलूप तुटलेले पाहिले. त्यांनी घरात प्रवेश केला, तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी लोखंडी कपाट उचकटून त्यातील 1 लाख 81 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. तसेच 10 तोळे सोन्या- चांदीचे 4 लाख 37 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले.
घटनास्थळी तातडीने पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अजय कोकाटे, मायणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल माने आदीसह पोलिस हवालदार दीपक देवकर यांनी भेट दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.



