पाटणची बाजार समिती निवडणूकीत जिंकायचीच : ना. शंभूराज देसाई

पाटण | पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी येथून राजकीय फायदा होण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जात आहे. गेली अनेक वर्षे सत्ता असूनही संस्थेची कोणतीही प्रगती नाही. ना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली. तालुक्यातील शेतकऱ्याची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार आहे. पाटणची बाजार समिती निवडणूकीत जिंकायचीच या हेतूने निवडणूकीच्या रिंगणात उतरूया असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
दाैलतनगर- मरळी (ता. पाटण) येथे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित मतदार,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, माजी चेअरमन अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, भरत साळूंखे, बबनराव शिंदे, व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. शंभूराज देसाई म्हणाले, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज मेळावा घेण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील इतर बाजार समितीच्या कारभार बघितला तर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करण्यात अपयश आले आहे. मराठवाडयातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासना मार्फत असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली बघायला मिळते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवाऱ्याच्या सुविधेसह त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीची चांगली व्यवस्था पहायला मिळते.परंतु पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला साधी बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली नाही. कार्य्रमाचे स्वागत व प्रास्तावित विजय पवार यांनी केले. आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.