डीजेला बंदी, परवानगी मागायचीच नाही : डाॅ. वैशाली कडूकर
गणेश मंडळांना अनंत चतुर्थीनंतर विसर्जनास परवानगी नाही

कराड – गणेशोत्सव काळात डाॅल्बीसह ध्वनिक्षेपांना आवाज मर्यादा आहे. परंतु, डीजेला बंदीच आहे त्यामुळे परवानगी मागायची नाही. गणेशोत्सव असो की अन्य कोणत्याही धर्माचा सोहळा, सण त्यात आनंद मिळाला पाहिजे. यासाठी आमुलाग्र बदल करणे गरजेचे असून एक जानेवारीपासून कराडमध्ये डाल्बी बंदीचा निर्णय सर्व कराडकरांनी घ्यावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे.
कराड येथे गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली. त्या बैठकीत डाॅ. वैशाली कडूकर बोलत होत्या. या बैठकीला
अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार कल्पना ढवळे, अशोकराव पाटील, मनसेचे दादासाहेब शिंगण, माजी नगरसेवक सौरभ पाटील, फारूख पटवेगार, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे झाकीर पठाण, सागर बर्गे, नितीन काशिद, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर म्हणाले, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक निर्णय घेत मोहम्मंद पैगंबर जयंती 16 सप्टेंबर ऐवजी 22 सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचे निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात कायदा, सुव्यवस्था पाळली जावी. गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थीलाच होतील. त्यानंतर विसर्जनास परवानगी दिली जाणार नाही.
मनसेचे सागर बर्गे म्हणाले, कलेक्टरांनी फ्लेक्सबाबत सूचना देवूनही कराड पालिकेकडून अमंलबजावणी केली नाही. तेव्हा पालिकेने त्या सूचना पाळाव्यात. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून गणेश आगमनापूर्वी ते किमान भरून घ्यावेत.
बैठकीला उशीर अधिकाऱ्यांकडून दिलगिरी
कराड येथील नागरिक 4 वाजता शांतता कमिटीची बैठक असल्याने वेळेवर उपस्थित होते. परंतु, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास बराच उशिर लागला. अधिकाऱ्यांकडून उशिर होत असल्याने उपस्थित लोकांकडून नाराजी व्यक्त केली जावू लागली. अशावेळी कराड येथील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहत बैठक सुरू केली. जवळपास 1 तास उशिरा बैठक सुरू झाली तर अप्पर पोलिस अधीक्षक 2 तास लेट आल्या. अशावेळी डीवायएसपी अमोल ठाकूर तसेच डाॅ. वैशाली कडूकर यांनी उपस्थित लोकांकडे दिलगिरी व्यक्त केली.