विवाहितेने प्रेमातून सोलापूरातील तरूणाचे केले अपहरण : सातारा जिल्ह्यातील दोघांना अटक

पुणे | आजपर्यंत अनेक प्रेम प्रकरणात मुलाकडून मुलीचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण पुण्यातील कोंढवा येथून चक्क एका विवाहितेने प्रेम प्रकरणातून एका सोलापूरातील 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमध्ये नेले होते. तर याप्रकरणी विवाहितेसह सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. सातारा, पुणे आणि सोलापूरशी संबधित या प्रकरणामुळे पोलिसही चांगलेच चक्रावले.
याबाबतची अधिक माहिती अशी, मूळ सोलापूरचा असलेला 23 वर्षीय तरुण गुजरातमधील वापी या ठिकाणी एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. तेथे राहत असताना त्याचे एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. परंतु या तरुणाचे लग्न त्यांच्या घरच्यांनी दुसरीकडे जुळवले होते, त्यामुळे त्याने त्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडले. लग्न जुळवल्यामुळे त्या तरुणाच्या घरच्यांनी त्याला घरी सोलापूरला परत बोलवले. घरच्यांनी बोलवल्यामुळे तो तरुण नोकरी सोडून सोलापूरला गेला. काही दिवस घरी राहिल्यानंतर तो पुण्यात भावाकडे राहू लागला होता. आपल्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्याचा राग मनात धरत वापीमधील महिलेने तरुणाच्या अपहरणाचा प्लान केला. या कामासाठी तिने प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना यासाठी पैसे दिले. या तरुणाचा एनडीए रस्ता परिसरातील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी त्या तरुणाचे अपहरण केले.
दरम्यान, उत्तमनगर पोलिसांनी तरूणाचे ज्या ठिकाणाहून अपहरण झाले तेथील सीसीटीव्ही तपासून या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊन त्या तरुणाची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या विवाहितेसह दोन तरुणांना अटक केले आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय- 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय- 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.