साताऱ्याचा पुढचा खासदार कोण? : शरद पवाराच्या आढावा बैठकीत सारंग पाटील, शशिकांत शिंदेंचं नाव आघाडीवर

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत साताऱ्यातून शशिकांत शिंदे, सारंग श्रीनिवास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. शरद पवार जे उमेदवार देतील तो निवडूण आणण्याचा निर्धार सातारा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीमधील अजित पवार गट राज्यातील सत्तेत सहभागी झाले आहेत. तर विरोधात ठाकरे गट आणि शरद पवार गट आहे. यापूर्वी जे लोकसभा मतदार संघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यावर आता आढावा सुरू आहे. महाविकास आघाडीतून सातारा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळणार असल्याने शरद पवार गटाकडून त्याचा आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा मतदार संघातील जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष, माजी आमदार आणि पक्षाच्या विद्यमान खासदारांना या बैठकीचे निमंत्रण होते.
महाआघाडीकडून कोणते मतदार संघ मागावेत, यावर बैठकीत भर देण्यात आला. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे या बैठकीला उपस्थित होते. पण प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी आगामी निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे पुत्र सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, या मतदार संघातून अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक- निंबाळकर हे संभाव्य वजनदार उमेदवार आहेत. तर ऐनवेळेला वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचाही विचार होवू शकतो. तेव्हा त्यांना टक्कर देण्यासाठी विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे किंवा कराड भागातील उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांचे नाव चर्चेत आले. पक्षफुटीनंतरही शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत गेले नाहीत. यामुळे शशिकांत शिंदे किंवा सारंग पाटील हेच साताऱ्यातून उमेदवार असू शकतील, असे बोलले जात आहे. तर खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील हे लोकसभेला इच्छुक असून त्यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.