कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

राजू शेट्टींच्या स्वाभिमानी नंतर आता सदाभाऊंची रयत क्रांती आक्रमक : ऊसदरासाठी कराडला उद्या करणार आंदोलन

कराड | चालू हंमागात ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकार मंत्र्यांच्या बैठकीनंतर पुणे- बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले असून आता रयत क्रांती संघटनाही आक्रमक झाली आहे. महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांतीने आंदोलनाचे हत्यार उपासल्याने सरकार विरोधात असंतोष दिसू लागला आहे. तसेच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर आता सदाभाऊंची रयत क्रांतीही ऊसदरासाठी आक्रमक होताना दिसत आहे. उद्या बनवडी फाटा (ता. कराड) येथे रयत क्रांती कडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3 हजार 500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने उद्या शुक्रवारी दि. 24 नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा (ता. कराड) येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना दिले आहे. या निवदेनामुळे आता रयत क्रांती शेतकऱ्यांच्या सोबतीला ऊसदाराच्या मैदानात उतरल्याचे पहायला मिळत असून सदाभाऊंची संघटना सरकारला काय इशारा देणार याकडे शेतकऱ्यांसह संघटनाचे लक्ष लागून आहे.

गेल्या एक वर्षभरापासून बाजारपेठेमध्ये साखरेचे दर 36 रुपयेच्या आसपास स्थिर राहिले आहेत आणि यावर्षी 38 ते 39 रुपये साखरेला भाव मिळत आहे. तसेच साखर कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती डिस्लरी, अल्कोहोल असे उपपदार्थ घेतल्याने त्याचाही फायदा कारखान्यांना झाला आहे. माळेगाव व सोमेश्वर या साखर कारखान्यांनी 11.80 उतारा असताना एफआरपी पेक्षा 550 ते 750 रुपये जास्त दिले आहेत. मग सातारा जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना, एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत. या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दुधाला सरकारने जाहीर केलेला भाव सध्या मिळत नाही, लिटरला पाच ते सात रुपये कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे. दुधाला 35 रुपये हमीभाव मिळावा, ही मागणी सुद्धा या आंदोलनात करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कराड भागातील शेतकरी हा क्रांतिकारक विचाराचा आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी 3 हजार 500 उसाचा दर घेत असेल तर आपला शेतकरीही मागे राहणार नाही. त्याला सुद्धा असाच उसाचा भाव मिळवून द्यायचा आहे, म्हणून शेतकऱ्यांनी गट- तट- पक्ष विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker