जादा सोन्याचे अमिष : ढेबेवाडी आठवडा बाजारात खरे दागिने घेऊन खोटे दिले

पाटण | जादा सोन्याचे आमिष दाखवून महिलेकडील खरे दागिने घेऊन त्या बदल्यात तिला खोटे दागिने देऊन लुबाडल्याची घटना ढेबेवाडीच्या आठवडा बाजारात घडली. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली असून, दोन अज्ञात भामट्यांवर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याशिवाय बाजारातून काही जणांचे मोबाईलही चोरीला गेल्याची माहिती मिळाली असून यामुळे ढेबेवाडीच्या आठवडा बाजारात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे दिसून आले.
याबाबतची अधिक माहिती अशी, पाणेरी (ता. पाटण) येथील पारूबाई संपत पवार (वय- 50) या आठवडा बाजाराला आल्या होत्या. चटणी तयार करण्यासाठी त्यांनी बाजारात मिरच्या खरेदी केल्या. त्यानंतर मसाला घेण्याकरिता त्या गेल्या असताना एका अनोळखी महिलेने त्यांच्याजवळ येऊन येथे सरकारी दवाखाना कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पारूबाई यांनी दवाखान्याकडे जाणारा रस्ता त्यांना दाखविला. त्यावर तेथून निघून न जाता त्या महिलेने तुमच्याकडे काम आहे, बाजूला चला, असे सांगून त्यांना बाजारतळा नजीकच असलेल्या बोळात नेले. त्याचवेळी तिथे एक अनोळखी व्यक्तीही आला. संबंधित महिलेने पारूबाई यांना सोन्यासारखा दिसणारा एक दागिना दाखवला व हा जास्त वजनाचा आहे तो तुला घे व तुझ्याकडील दागिने मला दे, असे सांगितले. त्यावर पारूबाई यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कुड्या काढून त्या महिलेला दिल्या आणि तिच्याकडील दागिना स्वतःला घेतला. त्यानंतर ती महिला व पुरुष दोघेही तेथून निघून गेले. मात्र, थोड्या वेळाने शंका आल्याने पारूबाई यांनी दागिन्याची खात्री केली असता तो खोटा असल्याचे समोर आले. याबाबतची तक्रार दिल्यानंतर अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भामट्या महिलेचे अंदाजे वय 40 ते 50 वर्षे असून, उंची साडेपाच फूट, तब्येत जाड, रंग सावळा, ओठ जाड, अंगावर तपकिरी रंगाच्या फुल्या असलेली पांढरी साडी असे वर्णन आहे.
तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीचे वय 20 ते 25 वर्षे असून, उंची अंदाजे साडेपाच फूट, रंग सावळा, अंगावर फूल बाह्यांचा काळा शर्ट, काळी जिन्स पँट असे वर्णन आहे. दोघेही मराठी भाषा बोलत होते. येथील बाजारात काही महिन्यांपूर्वी सोन्यासारखी दिसणारी बनावट बिस्किटे देऊन महिलेचे सोन्याचे खरे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. त्याशिवाय काल बाजारातून काही जणांचे मोबाईलही चोरीला गेल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी तपासाची चक्रे गतिमान केली असून, विविध पातळ्यांवर तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी सांगितले.