तांबवे येथे आईच्या वर्षश्राध्दाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कराड। तांबवे (ता. कराड) येथील सुरेश फिरंगे- पाटील यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयातील गोर- गरीब मुलांना शालेय गणवेशाचे वाटप केले. आईच्या वर्षश्राध्द वरती होणारा खर्च टाळून मुलाने त्याच पैशातून गणवेश वाटप करून नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन निवासराव पाटील, मुख्याध्यापक एस. व्ही. पोळ, माजी मुख्याध्यापक एच. पी. पवार, सुरेश फिरंगे- पाटील, आर. आर. पाटील सर्व शिक्षक- शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. तांबवे येथे ग्रामीण भागातील अनेक गरीब मुल- मुली शिक्षण घेत असतात. तेव्हा या मुलांना शिक्षण घेताना अडचण होवू नये, तसेच पालकांच्यावर खर्चाचा अतिरिक्त भार पडू नये. यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सुरेश फिरंगे- पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन निवासराव पाटील म्हणाले, रीती रिवाज जपणे गरजेचे असते, परंतु त्यासोबत पुढील पिढी घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आज सुरेश फिरंगे यांनी आपल्या आईच्या वर्षश्राध्दावर होणारा अनावश्यक खर्च एका चांगल्या सामाजिक कार्याला दिला. भविष्य घडविण्यासाठी एक आदर्शवत असा हा निर्णय आहे.