मनोज जरांगेंनी मर्यादित रहावं… त्यांचा बोलवता धनी कोण? : माथाडी नेते नरेंद्र पाटील वादात

मुंबई | नारायण राणे, रामदास कदम आणि नितेश राणे यांच्यानंतर आता ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतः चं बलिदान दिले ते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यावर जोरदार टीका होवू लागली आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे- पाटील यांना काही प्रश्न विचारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाबद्दल आणि फडणीस साहेबांबद्दल मनोज जरांगे यांनी जे वक्तव्य केले, ते बरोबर नाही. तसेच मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण, त्यांनी आंदोलनापुरतं मर्यादित रहावं असं म्हटल्याने सोशल मिडियावर नरेंद्र पाटील चांगलेच ट्रोल होवू लागले आहेत.
नरेंद्र पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना कसली भीती आहे, मला माहिती नाही. परंतु ते सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती व्यक्तीशा टीका करत आहेत. हे फार चुकीचं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सामील झाली त्याचा राग आहे का? उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सामील झाली याचा राग आहे का? तेव्हा त्यांचा बोलता धनी कोण आहे, हे मलाही माहिती नाही. बीडमध्ये आमदारांची घरे जी जाळण्यात आली. त्यानंतरही मनोज जरांगे- पाटील यांनी चुकीचे शब्द राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल काढले, हे फार चुकीचं आहे. मनोज जरांगे- पाटील यांना मी 2018 पासून ओळखतो ते चांगले आंदोलनकर्ते आहेत. परंतु गृहमंत्र्यांकडे एखाद्या आमदाराने किंवा लोकप्रतिनिधींनी तक्रार केली. आम्हाला धोका होऊ शकतो तर त्यावरती गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मग त्यांचं काय चुकलं. आज सराटी येथे घातपात होण्याची शक्यता असल्याचे जरांगे- पाटील म्हणतात. तर त्यामध्येही गृहमंत्री नक्कीच लक्ष घालतील. परंतु, भारतीय जनता पक्षाबद्दल आणि फडणीस साहेबांबद्दल मनोज जरांगे यांनी जे वक्तव्य केले ते बरोबर नाही. तुम्ही तुमच्या आंदोलनापुरतं मर्यादित राहावे, अशी माझी त्यांना विनंती आहे.
माथाडी नेते नरेंद्र पाटील नेटकऱ्यांच्या टार्गेटवर
नरेंद्र पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर आता टीका होवू लागली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे- पाटील यांचा बोलवता धनी मराठा समाज असून त्याच्यावर बोलू नये, असे अनेकांनी म्हटले आहे. तर नरेंद्र पाटीलांचा बोलता धनी देवेंद्र फडणवीस आहे, असे अनेकांनी म्हटले असून वडिलांचे बलिदान विसल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील तुमची भूमिका काय असेल ते आम्हाला माहित आहे तुमचा हातावर देवेंद्र फडणवीसचा टॅटू सुद्धा आहे, असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी टोला लगावला आहे.