साताऱ्यात बाजार समितीच्या नविन इमारतीवरून राडा : उदयनराजेंची एंन्ट्री, ऑफिस तोडले

सातारा । सातारा बाजार समितीमध्ये नविन इमारत भूमिपूजन कार्यक्रम आज होणार होता, तत्पूर्वीच, साताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक आमनेसामने आले असून जोरदार राडा झाला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून भूमिपूजन होणाऱ्या जागेवरील लोखंडी कंटेनर असलेले ऑफिस जेसीबीने नेस्तानाबूत केले आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
सातारा बाजार समितीत आ. शिवेंद्रराजे गटाची सत्ता आल्यानंतर निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती करण्यासाठी खिंडवाडी येथे साडेपंधरा एकरवर नवीन बाजार समितीची इमारत उभी करण्यात येत आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ आज बुधवारी दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु असताना खा. छ. उदयनराजे भोसले स्वतः दाखल झाले आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले आणि पोलिसांच्यात चर्चा सुरू आहे. सदरील जागा माझी असून मालक मी आहे. त्यामुळे माझे शेड मी तोडले तेव्हा तुम्हांला काय प्राॅब्लेम आहे. माझ्या जागेत शेड म्हणजे ते माझेच आहे. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे, असे छ. उदयनराजे यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता हा वाद वाढणार की मिटणार याकडे सातारावासियांचे लक्ष आहे.