सातारा जिल्ह्यात शरिराविरूध्द गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील 5 जण तडीपार

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता आडवुन दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, गर्दी मारामारी करून अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत येणारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या टोळीविरूध्द गुन्हे दाखल होते. कोरेगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. त्यास हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश दिला आहे.
यामध्ये टोळी प्रमुख 1) अथर्व अजय पवार (वय- 19 वर्षे, रा वसुधा पेट्रोलपंपाचे जवळ, कोरेगाव, ता. कोरेगाव), (टोळी सदस्य) 2) तौफिक शब्बीर शेख (वय- 20 वर्षे, रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव, ता. कोरेगाव), 3) निरज तानाजी बोडरे उर्फ फक्की (वय- 19 वर्षे, रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव, ता. कोरेगाव). तर दुसरी टोळीतील टोळी प्रमुख 1) युवराज भरत जगदाळे (वय- 22 वर्षे, रा. कुमठे, ता. कोरेगाव), 2) अथर्व सुशांत जगदाळे (वय- 21 वर्षे, रा. कुमठे, ता. कोरेगाव) या टोळी मधील इसमांना दाखल असले गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही. नोव्हेंबर 2022 पासून 9 उपद्रवी टोळ्यांमधील 24 इसमांना तडीपार करण्यात आले आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.