कराडजवळ रक्षाबंधन करून परतताना दुचाकीला अपघात : घटनास्थळी NDRF जवान

कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर कराड पासून काही अंतरावर असलेल्या वहागाव गावच्या हद्दीत रक्षाबंधन करून परतत असणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले असून एक 5 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. महामार्गावर ठेकेदाराने ठेवलेल्या डिव्हाईडरला धडकल्याने अपघात झाला असून घटनास्थळी एनडीआरएफची टीमने मदत केली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर कराडहून सातारच्या दिशेला निघालेल्या दुचाकीचा (क्रमांक एमएच- 11- एयु- 2184) रस्त्यावरील डिव्हाईडरला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एक 5 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून एक स्त्री व एक पुरुष असे तिघे जखमी झाले असून हे सर्वजण सातारा तालुक्यातील देवकरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याच दरम्यान, कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या NDRF जवानांकडून जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
या अपघातात लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला NDRF जवानांनी प्रथमोपचार केल्याने वेळेत उपचार मिळाले. अपघातातील कुटुंबाला जवानांनी धीर देत पुढील उपचारासाठी हलविले. यावेळी उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.