अभिनंदनीय : संदेश थोरात या तरूणाची लेफ्टनंटपदी निवड

पुसेसावळी । खटाव (Khatav) तालुक्यातील रहाटणी येथील संदेश संजय थोरात या तरुणाने अथक प्रयत्नाने भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट (Lieutenant) या अधिकारी पदाची शपथ घेतली. यावेळी त्याला कास्यपदकाने गौरवण्यात आले. संपूर्ण भारतातून 66 तर महाराष्ट्रातून 6 जणांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने कराड (Karad) व रहाटणी परिसरातून अभिनंदन होत आहे.

रहाटणी येथील साहेबराव थोरात यांचा संदेश हा नातू आहे. आजोबा भारतीय सैन्यदलात ‘सुभेदार’ या पदावर निवृत्त झाले. त्यांचा देशसेवेचा वारसा घेऊन संदेश देखील सैन्यदलात दाखल झाले. वडिल संजय थोरात हे भूकंप वेधशाळा, कराड याठिकाणी कार्यरत आहेत, तर आई जयश्री या गृहिणी आहेत. संदेशचे प्राथमिक शिक्षण होली फॅमिली कॉन्हेट हायस्कूल, कराड या ठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी सैनिकपूर्व प्राशक्षण संस्था (SPI), औरंगाबाद येथून बारावीचे शिक्षण + ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ (OTA) पूणे येथे एक वर्ष सैनिक प्रशिक्षण यशस्वी करत कास्यपदक पटकावले.

त्यानंतर MCEME सिकंदराबाद येथून B.Tech पूर्ण केले. त्या ठिकाणी तो गोल्ड मेडलिस्ट म्हणून गौरवण्यात आले. संदेश यांची ‘आर्टिलरी रेजिमेंट मध्ये लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कराड व खटाव तालुक्यातील अनेकांनी संदेशच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.



