स्वस्तातील सोने महाग पडले : पाचवड फाटा येथून साडेसहा लाख रूपये पळवले

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रुपये पळवून नेल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली असून सदरची घटना पाचवड फाटा येथे घडली आहे. या प्रकरणात सात ते आठ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, स्वतात सोने देण्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रूपये पळवल्याचा प्रकार पाचवड (ता. वाई) येथे सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद श्रीपती लक्ष्मण गावडे (वय- 32, मुळ रा. कानूर खुर्द, चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. श्रीपती गावडे हे हॉटेल मॅनेजर असून, त्यांना चोरट्यांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी साडेसहा लाखांची मागणी केली. श्रीपती गावडे व त्यांच्या मित्रांनी सोने खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार चोरट्यांनी त्यांना सोमवारी सायंकाळी पाचवड येथे पुणे- सातारा महामार्गालगत असलेल्या उसाच्या शेताजवळ बोलविले.
श्रीपती गावडे, पुंडलिक फाटक, विष्णू गावडे, आशिष गावडे हे सर्वजण सोने खरेदी करण्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उसाच्या शेताजवळ गेले. त्यावेळी तेथे अनोळखी सात ते आठ जण होते. त्यांच्याकडेही एक बॅग होती. श्रीपती गावडे यांच्या हातात साडेसहा लाखांची रक्कम असलेली बॅग होती. यावेळी श्रीपती गावडे यांनी संशयितांकडे सोने मागितले. त्यावर गावडे व त्याच्यासोबत असलेल्या सर्वांना बोलण्यात गुंतवत गावडे यांच्या हातातील पैसे असलेली बॅग हिसकावून संशयित चोरट्यांनी पोबारा केला. त्यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, तपास सहायक पोलिस रमेश गर्जे, हवालदार नितीन जाधव, शिवाजी तोडरमल आदी करीत आहेत.