दिवाळीचा शिधा : चोराडेत सरकारने दिला अन् दुकानदाराने अडवला

पुसेसावळी / ऐन दिवाळीतील सणासुदीच्या काळात चोराडे येथील वि. का. स सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानांमध्ये झालेल्या धान्याच्या अफरातपरीमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून संबंधित दुकानावरती कायदेशीर कारवाई होईल. परंतु दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळीचा माल मिळावा म्हणून पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानदारास तात्पुरता माल वाटप करण्यासाठी देण्यात आलेला आहे.
परंतु, सध्या या दुकानांमध्ये दिवाळीचा शिधा व रेशनींगचा माल पुरवठा विभागाने देवून सुद्धा या रेशनिंग दुकानदाराकडून वाटण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील सर्व सामान्य कार्ड धारकांचे नुकसान होत असल्यामुळे संबंधित तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता संबंधित रेशनिंग दुकानदारास माल वाटण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत. परंतु रेशनिंग दुकानातून कार्ड धारकांना मालाचे वाटप केले जात नसल्यामुळे संबधित तालुका पुरवठा आधीकाऱ्यांनी माल वाटपा संदर्भात रेशनिंग दुकानदारास पुन्हा एकदा सूचना देवून मालाचे वाटप सुरु करावे, अशी मागणी चोराडे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
खटाव तालुका पुरवठा निरीक्षकाच्या सूचना
चोराडे येथील संबंधित विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व सचिव यांना रेशनिंगचा माल व दिवाळीचा शिधा ज्या दिवशी दिला आहे. त्या दिवसा पासूनच मालाचे वाटप सुरू ठेवा अशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु अजुन पर्यत मालाचे वाटप करण्यात आलेले नाही, ही बाब गंभीर आहे. तरी आजही संबंधित दुकानदारांना माल वाटप करा अशा सूचना दिल्या असल्याचे खटाव तालुका पुरवठा निरीक्षक ए. के. शिंदे यांनी सांगितले.
दुकानदारांकडून लोकांची दिशाभूल
चोराडे वि.का.स.सेवा सोसायटीच्या रेशनींग विभागाकडून कार्ड धारकांना वेटीस धरण्याचे काम सुरू आहे. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता रेशनिंग वाटप सुरु करण्याचे आदेश रेशनिंग दुकानदारास दिलेले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार जाणून बुजून लोकांची दिशाभूल करीत असून माल वाटप करीत नाहीत, असा आरोप कार्ड धारक विलास पवार यांनी केला आहे.