कराडमधील ‘त्या’ स्फोटाचा रिपोर्ट आला… आ. नितेश राणेंचा संशय खरा कि खोटा?

कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत 25 आॅक्टोंबर रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामुळे घराची भिंत सुमारे 25 फूट वरती उडून समोरील घराच्या पत्र्यावरती पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटूंबातील 7 जण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की 7 घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घरे धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे 6 दुचाकी गाडीचेही नुकसान झाले आहे. या स्फोटा बाबतचा फाॅरेन्सिक लॅबचा रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये झालेला स्फोट कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता बाॅम्बस्फोट, जिलेटीन स्फोट किंवा अन्य कोणत्याही वस्तूमुळे स्फोट झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरचा अहवाल कराड शहर पोलिसांना प्राप्त झाला असल्याची पोलिसांकडून मिळाली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, कराड शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले होते. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला होता. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमीतील शरीफ मुल्ला आणि त्यांची पत्नी सुलताना मुल्ला यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी पाहणी करत बाॅम्बस्फोट करत असताना स्फोट झाल्याच संशय व्यक्त केला होता. फाॅरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमुळे आता आ. राणेंचा संशय फोल ठरला आहे.
सदरील स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. यावरून आ. राणे यांनी पोलिस तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असून लोकप्रतिनिधीचे नाव सांगून ब्रेकिंग न्यूज देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याअगोदरच फाॅरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे स्फोट झाला नसल्याचे म्हटले आहे.