कराड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुसऱ्यांदा ‘त्या’ इमारतीत चोरी

कराड । शहरात दोनच दिवसापूर्वी प्रशासकीय इमारतीनजीक चोरीची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच इमारतीमधील आणखी एका कार्यालयात चोरी झाली. चोरीच्या या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षय मस्के (रा. वारुंजी, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी सांगीतले की, वारुंजी येथील अक्षय मस्के यांचे प्रशासकीय इमारतीनजीक असलेल्या एका इमारतीत कार्यालय आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी या कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य त्यांनी लंपास केले. तसेच कार्यालयातील साहित्याचीही तोडफोड केली. याच इमारतीत दोन दिवसांपुर्वी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी एक घर, एक कार्यालय व हॉटेलमध्ये घुसून चोरी केली होती. संबंधित घरातून त्यांनी एअर पिस्टल, एअर गन चोरुन नेली. तसेच प्रसार माध्यमाच्या कार्यालयातून कॅमेरे, रोकडसह सुमारे पन्नास हजाराचे साहित्य लंपास केले. एकाच इमारतीत दोनदा चोरी झाल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हवालदार सुनील पन्हाळे तपास करीत आहेत.