सह्याद्रीच्या ऊसतोडणी कामगारांना संसारपयोगी साहित्यांची मदत

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस तोडणी कामगारांच्या 150 झोपड्या आहेत. त्यामधील ऊस तोडणी कामगारांच्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वयंपाक चालू असताना त्यातील पाच झोपड्यांना अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आग चांगलीच पसरली. आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य आदी जळून खाक झाले. सह्याद्री साखर कारखान्याचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी आग वेळीच प्रयत्नांची शर्थ करून आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आणल्याने बाजूच्या झोपड्यांना आगीची झळ बसली नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कारखाना परिसरातील ऊस तोडणी कामगारांच्या झोपडींना आग लागली व त्यात कामगारांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती सहकार व पणनमंत्री व आ.बाळासाहेब पाटील यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी तातडीने सर्व प्रकारची संसारपयोगी साहित्यांची मदत पोहोचवली.
महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस व माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगिता साळुंखे यांना आगीची माहिती सह्याद्री साखर कारखान्याचे उपशेती अधिकारी नितीन साळुंखे यांच्याकडून मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संसारपयोगी साहित्यासह गॅस शेगडीचे वाटप केले.
यावेळी मुख्य शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, उपशेती अधिकारी नितीन साळुंखे, इरिगेशन संपर्कप्रमुख आर.जी.तांबे, ॲग्रीकल्चर ओव्हरसियर युवराज साबळे व त्यांचा स्टाफ, मनीषा साळुंखे, मीनाताई साळुंखे, देवस्थान कमिटीचे सचिव रामराव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य कैलास साळुंखे, संजय चव्हाण, माई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव निरंजन साळुंखे, फिल्डमॅन मोरे व ऊसतोड कामगार त्यांचे सहकारी, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.