साताऱ्यात टक्केवारीवर कर्ज देणाऱ्या 5 खासगी सावकारांवर गुन्हा

सातारा | खासगी सावकारीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शहर पोलिस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित सुरेश शेंडे (रा. न्यू विकासनगर खेड) यांच्या फिर्यादीनुसार संजय ज्ञानेश्वर जाधव (रा. सायगाव, ता. कोरेगाव) व अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित शेंडे यांनी 14 ते 27 मार्च दरम्यान व्यवसायासाठी वेळोवेळी 6 लाख रुपये 10 टक्के व्याजाने ऑनलाइन पद्धतीने घेतले होते. त्यानंतर मुद्दल 6 लाख व व्याजाचे 3 लाख ऑनलाइन पद्धतीने दिले, तरीही संजय जाधव व अनोळखी दोघांनी घरी येऊन पैशाची मागणी करत कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचे शेंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद जफर गुलाम खान (रा. देवी कॉलनी, सातारा. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी दिली आहे. त्यानुसार प्रिया नीलेश नाईक व नीलेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खान यांनी संशयितांकडून 60 हजार रुपये 5 टक्के व्याजदराने घेतले होते. त्या वेळी 100 रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी रुग्णालयाची इन्चार्ज आहे, तुझी रुग्णालयातील नोकरी घालवीन, तसेच कर्ज आणि व्याज वेळच्या वेळी दिले नाही, तर दिवसाला 500 रुपये दंड द्यावा लागेल, अशी धमकी त्यांना दिल्याचे खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर तपास करत आहेत.