कराड शहरात मार्केटचा राजा गणपतीचे ढोल- ताशांच्या गजरात आगमन सुरू

कराड | कराड शहरातील मार्केटचा राजा या गणपतीचे आगमन आज रविवार (दि. 17) रोजी सुरू असून ढोल ताशे, झांज पथक व पारंपारिक वाद्य वाजवून केले जात आहे. गेल्या 4 तासांहून अधिक काळ ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठेतून सुरू असून रात्री 11 वाजेपर्यंत मिरवणूक चालेल असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि मंगळवारी दि. 19 रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील बाजारपेठ गर्दीने फूलून गेल्याचे चित्र पहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. शहरातील चाैका- चाैकात पोलिस अधिकारी, कर्मचारी दिसत होते.
मार्केटचा राजा या 11 फुटी गणपतीचे आगमन होत असल्याने गणेश भक्तांनी मार्केटच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. या गणपतीच्या आगमनासाठी बॅन्जो, झांजपथक, ताशा पथक तसेच पुण्यातील महिलांचे झांजपथक अशी वाद्ये वाजवत आगमन मिरवणूक सुरू आहे. या मिरवणूकीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पांढरी टोपी अन् पांढरा पायजमा असा लक्षवेधी पोशाख परिधान केला होता. शहरातील पहिला गणपतीचे आगमन होत असल्याने गणपती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.