नीरा नदीत लाखो मासे मृत्यूमुखी : साखर कारखान्याची दूषित मळी मिसळली

फलटण | साताऱ्यातील नीरा नदीत साखर कारखान्यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. नदीतील पाणी दूषित झाल्याने ही घटना घडली आहे. फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या दूषित पाण्यामुळे हा सर्व प्रकार झाला असल्याचे सांगितले जात आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले असून संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
धक्कादायक प्रकार घडला असून मृत झालेल्या माशांमधील 10 टन माशांची विक्री झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यामुळं नागरिकांच आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच संबधित विभाग आणि कारखाना विभाग या गोष्टीकडे अद्याप गांभीर्याने पाहताना दिसत नाही.