पुणे- बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकच्या भीषण अपघातात 3 जागीच ठार

सातारा | पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यात शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा फुटलेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चालकासह तीन ठार झाले आहेत. खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत मोठी वस्ती याठिकाणी हा अपघात झाला असून ट्रकच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर ट्रकचा (क्रमांक- केए- 53-सी-8343) टायर फुटल्याने चालक टायर बदलत असल्याने ट्रक उभा होता. यावेळी पाठिमागून आलेल्या आयशर ट्रकने (केए- 22- एए-1551) उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यावेळी आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह अन्य दोघेजण होते. अपघातात आयशर ट्रकची केबिन चेपल्याने तिघेही अडकले होते. या जखमींना शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी शिरवळ पोलिसांनी हलविले होते, मात्र उपचारापूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातानंतर तात्काळ शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. भीषण अपघातामुळे काही काळ मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले होते. सातारा- पुणे मार्गावर झालेल्या या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये लाकडी साहित्याची वाहतूक होत होती, तर पाठिमागून आलेल्या आयशर ट्रकमध्ये कोबी व भाजीपाला नेण्यात येत होता. घटनास्थळी शिरवळ रेस्क्यू टीम, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, फलटण डीवायएसपी राहूल धस, पोलिस पीआय नवनाथ मदने यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.