खटाव तालुक्यातील 5 वर्षापासून फरारी आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात
कराड | गत पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. साजन किर्लोस्कर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाण्यात साजन शिंदे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. गत पाच वर्षांपासून त्या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो आपली ओळख लपवून तसेच पेहराव बदलून ठिकठिकाणी राहत होता. सध्या तो सिद्धेश्वर कुरोली गावात असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, नाईक संजय जाधव, आनंदा जाधव, महेश शिंदे यांच्यासह पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. आरोपी साजन शिंदे याच्यावर शनिवारी पहाटेपासून पाळत ठेवण्यात आली होती. तसेच दुपारी पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात तीन आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.