कराडचे अनमोल रत्न म्हणजे पृथ्वीराज बाबा
विशेष लेख । कराड
काल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाच्या निरिक्षणांपैकी चार मुद्दे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. फक्त एकच मुद्दा त्यांच्या विरोधात गेला तो म्हणजे त्यांनी दिलेला राजीनामा.
माजी मुख्यमंंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार आदरणीय पृथ्वीराजबाबांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायला हवे होते, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात माध्यमांना दिली होती. या प्रतिक्रियेत पृथ्वीराजबाबांचा संसदीय कामकाजाचा अभ्यासूपणा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पृृथ्वीराजबाबांनी 11 महिन्यांपुर्वी नोंदवलेल्या प्रतिक्रियेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या माध्यमातून राजकीय वर्तुळात कराडचे नाव पुन्हा एकदा ठळक झाले. कराडची ओळखच अभ्यासू नेतृत्व अशी आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव येते. अत्यंत उच्चशिक्षित असलेले आणि 40 च्या दशकात LLM पदवी घेतलेले आनंदराव चव्हाण यांचे नाव येते. तर संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रेमीलाकाकी यांची नावे घेणे क्रमप्राप्तच आहे. अशी अभ्यासू नेतृत्वाची ओळख असलेलं कराड पृथ्वीराज बाबांच्या रूपाने राज्यातच नव्हे, तर देशभर ओळखलं जातं.
गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयाच्या कार्यालयातून पृृथ्वीराजबाबांच्या प्रतिक्रियेसाठी फोन खणखणत होता आणि त्यांच्या मुंबई कार्यालयात माध्यमांची रिघ लागली. यावेळी माध्यमांनी पृथ्वीराज बाबांना 10 महिन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत प्रतिक्रिया विचारली असता. पृथ्वीराज बाबा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ओढलेले ताशेरे गंभीर स्वरूपाचे असून नैतिकतेच्या आधारे शिंदे फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. तसेच पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी तज्ञाच्या सल्ल्याने निर्णय होतील.
पृथ्वीराजबाबांच्या अनुभवाला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात जराही दुर्लक्षित करता येणार नाही, हा संकेत पुन्हा एकदा मिळाला. खरं तर कराडकरांनी पृथ्वीराजबाबांसारखे नेतृत्त्व जपत त्यांना कायमच साथ दिली आहे. त्यामुळे बाबा आपली अभ्यासू भुमिका ठामपणे मांडत असतात. शुक्रवारीही प्रत्येक पेपरमधे पृथ्वीराजबाबांची प्रतिक्रिया अगदी ठळकपणे प्रसिद्ध झाली. तसेच सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांच्या 11 महिन्यापूर्वीच्या भाकिताची दखल घेत मतही नोंदविले. जर त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पृथ्वीराज बाबांचा सल्ला घेतला असता तर सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून वेगळा लागला असता. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षातील प्रमुख स्थान असलेला अभ्यासू नेता म्हणून पुन्हा एकदा पृथ्वीराजबाबांचे स्थान बळकट असल्याचे हे उदाहरण आहे.