साताऱ्यात प्रेमवीरांची बंधाऱ्यात आत्महत्या : विवाहीत युवतीचा मृतदेह आढळला, युवक अद्याप बेपत्ता

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
कोंडवे (ता. सातारा) येथील डोंगरालगत असणाऱ्या एका बंधाऱ्यात प्रेमीयुगल असलेलल्या युवक व विवाहित युवतीने दुपारी उडी मारून आत्महत्या केली. यामधील विवाहीत युवतीचा मृतदेह रात्री उशिरा शोधण्यास शिवेंद्रराजे ट्रेकर्सला यश आले असून युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही. अक्षय जोतीराम पवार (वय- 26) आणि गौरी विजय चव्हाण (वय- 23) अशी आत्महत्या केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोंडवे येथील डोंगरालगत एक बंधारा असून गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे मोठा पाणीसाठा साठलेला आहे. या डोंगरालगत रविवारी काही शेतकरी दुपारच्या सुमारास गुरे चारत होते. यादरम्यान त्याठिकाणी एक युवक आणि युवती आली. थोडावेळ बंधारा परिसरात थांबल्यानंतर त्या दोघांनी बंधाऱ्यात उडी मारल्याचे डोंगरावर गुरे चारणाऱ्यांपैकी एकाने पाहिले. त्याने पळत जाऊन बंधाऱ्यात पाहिले. परंतु तोपर्यंत ते दोघेही पाण्यात बुडाले होते. बंधाऱ्यात युवक-युवतीने उडी मारल्याची माहिती संबधिताने सातारा तालुका पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बंधाऱ्यातील गाळात दोन मृतदेह रुतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी मदतकार्य करणाऱ्या पथकांना बोलावले. सततचा पाऊस आणि अंधार पडल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत होता. यानंतर विद्युत झोत तसेच बोट आणत पोलिसांनी रात्री पुन्हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. यामध्ये गाैरी विजय चव्हाण या विवाहीत युवतीचा मृतदेह काढण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सला यश आले.