मसूरच्या पाटील वाड्यातील मानाच्या श्री गजाननाची यात्रा ‘बाप्पा मोरयाच्या’ जयघोषात

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
‘गणपती बाप्पा मोरयाच्या’ जयघोषात.. गुलालाच्या उधळीत.. दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रदर्शनासह कोल्हापूरच्या शिद्रापूरमधील पथकाच्या हलगी सनईच्या सुरात…. कागलच्या व्हनाळीच्या लहान मुलांच्या जय शिवराय लेझीम पथकाच्या निनादात मसूरच्या पाटीलवाड्यातील मानाच्या श्री गजाननाची यात्रा सांस्कृतिक, धार्मिक पद्धतीने व उत्साहात आज पार पडली. चार वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीने श्री गणेशाचे कासार डोहात विसर्जन करण्यात आले. दीडशे वर्षापासूनची परंपरा लाभलेल्या उत्सवाचा समारोप यात्रेने झाला.
अनंत चतुर्दशीला रात्री राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प उद्धव जावडेकर पुणे यांच्या कीर्तनानंतर सांगलीकरांचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम पहाटे पाच वाजेपर्यंत चालला सूर्योदयावेळी मानाच्या श्री चे वाड्यातून पालखीतून प्रस्थान झाले चावडी चौकातून यमाईगल्लीमार्गे बाजारपेठेत श्री चे मिरवणुकीने आगमन झाले. गणपती समोर परंपरेनुसार दानपट्टा व मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रदर्शनासह आदी उपक्रम पार पडले. प्रदर्शनात लहान मुलांचा सहभाग तितकाच चर्चेचा ठरला.
दुपारी तीन वाजता श्री चे मिरवणुकीने बाजारपेठेतून प्रस्थान झाले. दर्शनासाठी भाविकांची विशेषता महिलांची गर्दी झाली होती. पालखी सभोवताली नारळ, गुलाल, पेढे, प्रसाद विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. प्रथेनुसार कासार डोहात गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. पेढ्यांचा प्रसाद वाटप झाला. गणेशाच्या भरविण्यात आलेल्या यात्रेत तमाशा कार्यक्रम झाला. यात्रेनिमित्ताने मिठाईची दुकाने, सौंदर्यप्रसाधने, खेळण्याचे स्टॉल, गगनचुंबी फिरते पाळणे, छोटे मोठे व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाचा समारोप यात्रेने झाला. या गणपतीच्या अगोदर पत्र्याच्या वाड्यातला, दिंडीवाडा, दत्तोबा (आप्पा) पाटीलवाडा, भागवत तात्या वाड्यातल्या मानाच्या गणपतीचे आज पहाटेपर्यंत विसर्जन झाले.



