गॅसचा ब्लास्ट नाही, कदाचित बाॅम्ब टेस्टिंगमुळे सगळं फुटलं : आ. नितेश राणेंनी कराडमध्ये केली पाहणी
कराड | कराडच्या मुजावर कॉलनीत झालेल्या स्फोटाबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असून याचा तपास एटीएसकडूनच करावा, स्पष्ट डोळ्यांनी दिसतयं की गॅस सिलेंडरचा विषय नाही. एक गॅस सिलेंडर फुटला तर बाकीचे सिंलेडर सुरक्षित कसे काय बाहेर काढले, म्हणजे गॅस सिलेंडरचा ब्लास्ट नाही. आत जो शरिफ मुल्ला नावाचा जिहादी आहे, तो कदाचित आतमध्ये बसून बाॅम्ब टेस्टिंग करत असेल. त्या बाॅम्ब टेस्टिंगमुळे सगळं फुटलं असेल. घटनास्थळावरून केमिकल सापडलं आहे, मग पोलिस कुठला निष्कर्ष लावतायत. त्यामुळे एटीएस पथकाने तपास करावा, अशी मागणी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज कराडात केली. येथे बाॅम्ब तयार हाेत असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाखाली खपविणार असाल तर ते चालू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील कराड येथील मुजावर कॉलनी येथे मागील आठवड्यात झालेल्या स्फ़ोटामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचीही राणे यांनी पाहणी केली. या स्फोटाबाबत तपास करणाऱ्या अधिकारी यांच्याशी राणेंनी चर्चा केली. गृहखाते बदनाम होणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा देत श्री. राणे म्हणाले, एटीएसकडूनच कराडच्या स्फोटाचा तपास व्हावा. हिंदु समाजाच्या विरोधात कोण वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जिल्ह्यातील चांगले अधिकारी आहेत. मात्र काही अधिकारी अजूनही गैरसमजात आहेत. त्यांना योग्य ती जागा दाखविण्यासाठी आम्ही सजग आहोत.
जिल्ह्यात कोण कसे काम करतो, याची जाणीव आम्हाला आहे. एटीएसने पोलिसांना गॅस गळतीचा प्राथमिक अंदाज दिला असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात मला द्यावा. अन्यथा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. बॉम्ब सदृश्य केमीकल त्या घरात आढळळे होते. त्याचा कोठे उल्लेख आला आहे का, पोलिस कोणत्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत आहेत. याची जाणीव आम्हाला आहे त्यामुळे त्यांची नावे या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात आवाज उटवूनच जाहीर करणार आहे. त्यात जे अधिकारी दोषी दिसतील त्या सर्वांना कामाला लावले जाणार आहे. येथून गेल्यानंतर दौऱ्याबाबत देंवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना माहिती देणार आहे. त्यामुळे त्याचा तपास एटीएसतर्फेच करावा, असा आमचा आग्रह आहे.
श्री. राणे म्हणाले, सातारा जिल्ह्यात ज्या काही पीएफआयच्या हालचाली सुरू आहेत. त्या सगळ्या रोखण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढची दिशा ठरवत आहोत. कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून नव्हे तर मी हिंदू म्हणून आलो आहे. त्यामुळे उद्या येथे बॉम्ब तयार होत असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाखाली खपवणार असाल तर ते चालू देणार नाही.