वाई तालुक्यातील 24 घरानंतर जावळी तालुक्यात 7 घरे चोरट्यांनी फोडली
सातारा | वाई तालुक्यात शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 बंद घरे फोडून सोने व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री चोरट्यांनी जावळी तालुक्यातील भिवडी येथील 7 बंद घरे फोडून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज पळविला. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री वाई तालुक्यातील चोरट्यांनी 24 घरे फोडली होती. या घटनेनंतर 24 तासांच्या आतच चोरट्यांनी भिवडीतील सात घरे फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, भिवडी (ता. जावळी) येथे शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी सात बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळविली. यामध्ये किसन चव्हाण यांच्या घरातून तीन तोळ्यांचे गंठण, सागर भिसे यांच्या घरातून अर्धा तोळ्याची अंगठी व अठराशे रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. बबन चव्हाण, कृष्णराव चव्हाण, रविकांत दरेकर, भरत चव्हाण, संपतराव तरडे यांचीही घरे अज्ञात चोरांनी फोडली; परंतु त्यातून त्यांच्या हाती फार काही लागले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, चोरट्यांनी घरातील कपडे, सामानाची तोडफोड व नासधूस केली.
दरम्यान, गावातील एका घरातील कपाट चोरटे उचकटत असताना शेजारील घरातील व्यक्तीला जाग आली. त्याला आवाजावरून चोरीचा संशय आला. त्याने गावात चोर घुसल्याची तातडीने गावातील सरपंच व पोलिस पाटील यांना मोबाईलवरून माहिती दिली. मात्र, चोरटे पळून गेले. ग्रामस्थ घराबाहेर आले असता त्यांना काही घरांचे कडी-कोयंडे तोडल्याचे दिसले. त्यानंतर सरपंचांनी ग्रामपंचायतीचा भोंगा वाजवून सर्वांना धोक्याची सूचना दिली. या चोरीची माहिती पोलिस पाटलांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर कुडाळ पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंद व सहकस्यांनी घटनास्थळी भेट दिली.