पाटण शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : रात्रीत 4 दुकाने फोडली

पाटण | पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने फांडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 25 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याची नोंद पाटण पोलिसात झाली आहे. दरम्यान, भरवस्तीत ही चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 23 रोजी रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाटण शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचाच फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. यात हेमंत किसन फाटक यांच्या बिल्वदल बझारचे शटर फोडून 24 हजार रुपये, विजय लुगडे यांचे किराणा दुकान फोडून 500 रुपये व सुनील फुटाणे यांची बेकरी फोडून 1 हजार रुपये असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे लंपास झाले आहेत.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लायब्ररी चौक येथील ट्रॉफी दुकानातहून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याचे समजते असून याची नोंद मात्र पोलिसात नाही. याची फिर्याद दुकान मालकांनी पाटण पोलिसात दिली आहे. याचा अधिक तपास एएसआय एस. बी. राऊत करत आहेत.