कराडात शतपावली करणाऱ्या आज्जींना जेवलात का? म्हणत चोरट्याने चैन चोरली
कराड । चोरटा गंठण हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना वृद्धेने झटापट केल्यामुळे गंठणऐवजी हाताला लागलेली चांदीची चैन घेऊन चोरटा पसार झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अलका सुभाष कदम (रा. बुधवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुधवार पेठेत राहणाऱ्या अलका कदम या दररोज रात्री जेवण केल्यानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडतात. गुरूवारी रात्रीही त्या जेवण करुन दहा वाजण्याच्या सुमारास शतपावलीसाठी बाहेर पडल्या. कृष्णा नाक्याकडून त्या पायी चालत उपजिल्हा रुग्णालयाकडे आल्या. त्यावेळी भाग्यश्री प्रिंटिंग प्रेससमोर एका व्यक्तीने पाठीमागून येऊन अलका कदम यांना हाक मारली. आजी जेवलात का, असे त्याने विचारले. मात्र, काही कळण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील गंठण व चांदीची चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना गेटवर ढकलून दिले. त्यानंतर चोरटा कृष्णा नाक्याच्या दिशेने निघून गेला.
या झटापटीत अलका कदम यांच्या गळ्यातील गंठण बचावले. मात्र, चांदीची चैन चोरट्याने लंपास केली. दरम्यान, त्यांना गेटवर ढकलल्याने अलका कदम जखमी झाल्या. घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रकार मुलगा अतुल सुभाष कदम याला सांगितला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद कºहाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.