खटाव तालुक्यात गावठी कट्टा व तलवार घेऊन गावात फिरणाऱ्याला अटक

सातारा प्रतिनिधी वैभव बोडके
खटाव तालुक्यातील रामोशीवाडी- जाखणगाव येथील टेकवस्तीवर राहणाऱ्या एकाकडून गावठी कट्टा आणि तलवार अशी शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच संशयित आरोपी अंकुश गणपत मदने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चाैकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामोशीवाडी- जाखणगाव येथील टेकवस्तीवर अंकुश मदने याच्याकडे गावठी पिस्टल व तलवार असल्याबाबत आणि गावात तो शस्त्रे घेवून फिरत असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना गोपनीय खबऱ्याने माहिती मिळाली होती. संशयिताचा शोध घेवून शुक्रवारी दि. 20 रोजी रात्री पावणेआठ वाजणेच्या सुमारास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस हवालदार श्रीनिवास सानप यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. येवले हे करीत आहेत.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, कोरेगाव उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे, सुभाष शिंदे, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी सदरची कारवाई केली आहे.
पिस्टल प्रकरणात 83 आरोपींवर कारवाई
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारलेपासून नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जिल्ह्यात एकूण 28 गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये 53 पिस्टल / रिव्हॉल्वर व 51 काडतुसे जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात 83 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.



