मेंढरामागं धावणारं पोरंग… साहेब झालं : तांबवेत आयकर उपायुक्त सचिन मोटेंचा सत्कार

कराड | विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यातील माण- खटाव आणि सांगलीचा जत- आटपाडी तालुका म्हणजे दुष्काळी भाग. एका- एकाला 10 एकरापासून 100-200 एकर जमीन पण पाणी नसल्याने नुसतीच जमीन धडं कुसळ पण उगवत नव्हती अशी परिस्थिती होती. यामध्ये गेल्या काही वर्षात थोडाफार बदल होवू लागला आहे. परंतु त्या अगोदर 2015 पूर्वी या भागातील माणसं जमीनीने, मनानं श्रीमंत पण आर्थिक परिस्थितीने पिचलेली अन् गरिबीनी होरपळलेली होती. अशा परिस्थितीतून जगण्याचा संघर्ष सुरू ठेवण्यासाठी कराड भागात अनेक मेढपाळ आपली कुटुंब घेवून येत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील विभुतीवाडी (ता. आटपाडी) येथील श्री. बिरा दगडु मोटे व सौ. सुभद्रा मोटे हे दाम्पत्य 25 ते 30 वर्ष मेंढरं घेऊन येत होते. या दाम्पत्यांपोटी सचिन नावाचं अपत्य जन्माला आलं. तांबवे (ता. कराड) भागातील शिवारातील रानं मोकळी झाल्यानंतर मेंढपाळ आपली मेंढरं घेऊन बिऱ्हाडासह येत असे. या मोटे दाम्पत्यांचा सचिन हा साहेब झाला असून त्यांच्या हस्ते नवपिढीचा सन्मान करण्यात आला.
दक्षिण तांबवे येथील भैरवनाथ नवरात्र आणि गणेश मंडळाने सचिन मोटे साहेबांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी मोटे दांम्पत्यासह सचिन यांचा केलेल्या सत्काराने मोटे कुटुंबिय भारावले. सचिन मोटे बालपणी आपल्या आई-वडीलांसोबत तांबवे शिवारात मातीत, ढेकळात मेंढरामाग पळत असे. आपल्या गरीबीवर मात करून एम. बी. बी. एस चे शिक्षण पुर्ण करुन पुढे सचिन मोटे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपुर्ण देशातुन अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाले. मेंढपाळ कुटुंबातील सचिन मोटे सध्या आयकर उपायुक्त म्हणून मुंबई येथे केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत आहेत.
यावेळी सचिन मोटे म्हणाले, जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, तेव्हा शिक्षणाची कास सोडु नका असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला. परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळा निर्माण होवू शकतो, परंतु थांबू शकत नाही. आज स्पर्धेच्या युगात शिक्षण पध्दती आणि शिक्षणातील योग्य निवड तुम्हांला यशाचा मार्ग दाखवेल. तरूणांनी योग्य वयात शिक्षण घेणे गरजेचे आहे.
आयकर उपायुक्त सचिन मोटे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी-पालक तसेच दक्षिण तांबवे जिल्हा परिषदेचे शिक्षिका सिमा देसाई, मुख्याध्यापक आबासो साठे आणि मनिषा साठे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड.नितिन शेलार, उपसरपंच ॲड विजयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी बेलवडे बुद्रुकचे सरपंच डाॅ .सुशांत मोहिते, ॲड. रविंद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक वसंत बाबर यांनी केले. स्वागत भैरवनाथ मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केले. सुत्रसंचालन राहुल साठे यांनी केले. आभार सुरेश शेळके यांनी मानले