थरारक : वारूंजीच्या मैदानात ड्रायव्हर पडला पण बिगर ड्रायव्हर बैलांनी मैदान मारले

कराड | कराड पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अोपन बैलगाडी शर्यतीस सुरूवात झाली आहे. सत्यजित केसरी 2023 चे मानकरी कोण होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या शर्यतीत चर्चेत ठरली ती गट क्रमांक 3 मध्ये बिगर ड्रायव्हर पळालेली शालीग्राम प्रसन्न, शाळगाव या बैलगाडीच्या सोन्या आणि महाराज या बैलजोडीने विजय मिळवत सेमीफायनल पात्र ठरली. सोन्या आणि महाराज या बैलजोडीचा गाडीचा चालक मैदानावर पडला, त्यानंतरही या गाडीने विजय मिळवल्याने एकच चर्चा सुरू होती.
वारूंजी येथे पर्व 2 रे असलेल्या सत्यजित केसरीचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, युवा उद्योजक सुनिल बामणे, बाजार समितीचे उपसभापती संभाजी चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बैलगाडा मालक व चालक यांच्यासह प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. या शर्यतीत विजेत्यांना 1 लाख रूपये रोख, 75 हजार रूपये, 50 हजार रूपये, 35 हजार रूपये, 25 हजार रूपये आणि 15 हजार रूपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
वारूंजीत आयोजित बैलगाडी शर्यतीत गट क्रमांक 1 मध्ये – आरव मोहन शेठ नांदेड सिटी यांच्या सुंदर आणि रोमण या बैलजोडीने विजय मिळवला. गट क्रमांक 2 मध्ये- बाहुल्या ग्रुप वारूंजी- आगाशिवनगर यांच्या सोन्या आणि लक्ष्मण बैलजोडीने विजय मिळवला. गट क्रमांक 3 मध्ये – शालीग्राम प्रसन्न, शाळगावकरांचा सोन्या आणि केसेकरांचा महाराज या बैलजोडीने विजय मिळवला. गट क्रमांक 4 मध्ये – पै. आनंदराव मोहिते यांच्या लक्ष्या आणि सर्जा यांनी विजय मिळवला. गट क्रमांक- 5 मध्ये जावेद मुल्ला तांबवे सर्जाने मैदान मारत सेमीफायनल मध्ये धडक मारली.