कराडला मराठा समाजाच्या अधिवेशनाला येणाऱ्या वाहनांना टोलनाका माफ : अनिलबापू घराळ
कराड | कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 18 जून रोजी कराड येथे राज्यस्तरीय मराठा समाजाचे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. सौ. वेणुताई चव्हाण सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनाला 25 जिल्ह्यातील समन्वयक, अभ्यासक व व्याख्याते उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू घराळ व राजेंद्र निकम यांनी दिली.
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या मराठा अधिवेशनाची माहिती देण्यासाठी कराड येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिलबापू घराळ, राजेंद्र निकम, संजय पवार, शहर अध्यक्ष संदिप काळे, वैशाली जाधव, विवेक कुऱ्हाडे, युवराज कुऱ्हाडे, उत्तम भोसले आदींची उपस्थिती होती.
राजेंद्र निकम म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभरात समाज्याच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. तर ठोक मोर्चेही निघाले. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. वास्तवीक 50 टक्क्यांवरील आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकणारे नाही. त्यामुळे मराठा समाजाला 50 टक्केच्या आतील ओबिसी आंतर्गत आरक्षण मिळायला पाहीजे. यासाठी पुन्हा मराठा सामजात जागृती करण्यासाठी व समाजाची वज्रमुठ बांधण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आले आहे.
अनिलबापू घराळ म्हणाले की, राज्यभरातील जवळपास 25 जिल्हयातील समन्वयक अधिवेशनाला हजर राहणार आहेत. तर 10 व्यख्याते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत. दोन सत्रात अधिवेशन होणार आहे. मराठा समाजाला संविधानिक आरक्षण कसे मिळेल याबाबत या अधिवेशनात विचारमंथन होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटी ठराव करण्यात येणार आहे. अधिवेशनलाल येणाऱया वाहनांसाठी आनेवाडी व शिंदेवाडी टोलनाका फ्रि करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.