‘कृष्णा’ कारखाना जिल्ह्यात अव्वल : शासनाला व्हॅट व GST 128 कोटी रूपये भरले
कराड । सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी 128 कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कर रूपाने गोळा होत असते. कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत, सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे व्हॅट करापोटी 97 कोटी रूपये आणि जीएसटीपोटी 31 कोटी असा एकूण 128 कोटी रूपयांचा भरणा केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरला आहे.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सर्व संचालक मंडळ, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वाधिक कर भरणा केल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे. सत्कार समारंभात राज्यकर सहआयुक्त सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शना खाली उपायुक्त तेजस्विनी मोरे, राज्यकर उपायुक्त नंदकुमार सोरटे यांच्या हस्ते कारखान्याच्यावतीने फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, टॅक्स अकौंटंट विठ्ठल साळुंखे यांनी सन्मान स्वीकारला.