शेरे येथून 56 हजारांचे साहित्य चोरणाऱ्या 23 वर्षीय दोन युवकांना अटक

कराड | शेरे स्टेशन (ता. कराड) येथून सुमारे 56 हजार रूपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत अधिकराव आनंदराव पाटील (वय- 76, रा. शेरे स्टेशन) यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राहुल चंद्रकांत पाटील (वय- 23), सागर राजाराम हजारे (वय- 23 दोघेही रा. शेलोली स्टेशन- शेरे, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील आठ दिवसापूर्वी अधिकराव पाटील यांचे शेरे स्टेशन येथील कृष्णा कॅनॉलजवळील शेतजमिन सर्व्हे नं. 151 मध्ये देशी गाईंचा गोटा बनवण्यासाठी आणलेले पन्नास फूट लांब व सहा फूट उंच लोखंडी जाळी 6 बंडल, 16 फुटी लोखंडी अँगल 10 नग, 10 फुट लांबीचे लोखंडी खाब 6 नग व पत्र्याची 25 पाने दोघांनी चोरून नेली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी जाळी व इलेक्ट्रॉनिक मोटार असा 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.