पर्यटकांनो साताऱ्याला फिरायला निघालाय, थांबा : यादिवशी ‘हा’ मार्ग राहणार पूर्ण बंद

सातारा। सांबरवाडी हद्दीतील सातारा येवतेश्वर- कास या घाटातील धोकादायक दरड कोसळल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीची उपायोजना घेण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येथील यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड फोडण्याची कार्यवाही सोमवारी 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. यादरम्यान रविवार 23 जुलै 2023 रोजी रात्री बारा वाजल्यापासून सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर- कास रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठार,तसेच जलदायिनी कास कडे पर्यटकांची मोठी गर्दी असते, सांबर वाडी, यवतेश्वर, तसेच अगदी बामणोली पर्यंतच्या ग्रामस्थांना येण्या- जाण्यासाठी सांबारवाडीचा एकमेव घाट रस्ता आहे. त्यामध्ये दरड महाकाय दगड कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. आता सदरील ठिकाणावरील दरड (दगड) हटविण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत अवटी यांनी तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश काढले आहेत.
तसेच धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात कोणी व्यक्ती, पशूधनास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये, म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.