पर्यटक अडकले : यवतेश्वर घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
सातारा | सातारा शहर ते कास पठार या मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावरून प्रवास करणारा एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. तर रस्त्यावर दरड व दगडी कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने व नुकताच मान्सून पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांनी कास पठार परिसरात गर्दी केली होती. या भागातील निसर्ग साैंदर्य मान्सून पावसाने फुलल्याने पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. शनिवारी दिवसभर निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक परत माघारी फिरत असताना यवतेश्वर घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.
सायंकाळी उशिरा घाटात दरड कोसळल्याने कास- सातारा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. पर्यटक याठिकाणी अडकले असून पोलिस व प्रशासन घटनास्थळी अद्याप दाखल झाले नाही.